Scope & Opportunities after Industrial Training education

प्राध्यापक, श्री. राजेंद्र वाळुंज

 प्राचार्य

 

Scope & Opportunities after Industrial Training education
(आयटीआय क्षेत्रातील करियरचे मार्ग आणि संधी)

“आजच्या काळात औद्योगिक क्षेत्रात लागणारे कुशल मनुष्यबळ आणि दुसरीकडे तरुणांमध्ये रोजगाराची असणारी गरज यांच्याकडे बघता आयटीआय हे क्षेत्र या दोघांमधील दुवा आहे असं आपण म्हणू शकतो .”

औद्योगिक क्षेत्रात मागणी असणारे कुशल कारागीर घडवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार मिळवण्याची कौशल्ये विकसित करणे हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे मूळ उद्दिष्टये मानले जाऊ शकते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त करणे अथवा स्वतः उद्योजक होण्याची क्षमता हे दोन्हीही उद्दिष्ट्ये साध्य केली जाऊ शकतात.

आजच्या स्पर्धात्मक युगात शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या पदवीसोबत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असणे देखील महत्वाचे मानले जाते. आज औद्योगिक क्षेत्र हे अतिशय प्रचलित आणि मुख्यतः ग्रामीण भागात हे विशेष लोकप्रिय असलेले बघायला मिळते.

शासनमान्यता प्राप्त असणारा हा कोर्स १०वी किंवा १२वी चे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी करू शकतात. इतर शैक्षणिक क्षेत्रांपेक्षा आयटीआय मधील वेगळेपण सांगायचे झाल्यास शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञान वाढविण्यावर विशेष भर इथे दिला जातो. कारण विद्यार्थ्यांकडे असणारी कौशल्ये हे योग्यरीत्या वापरण्याची क्षमता प्राप्त करायची असल्यास त्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक ज्ञान असणे देखील तितकेच गरजेचे आहे, जे औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रात आपल्याला विशेष बघायला मिळते.

याकडे बघता कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानेदेखील देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना त्यांच्या सुविधा, कामगिरी आणि प्लेसमेंट रेकॉर्डच्या आधारे त्यांना दर्जा देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे हे क्षेत्र अधिकाधिक प्रगत होत चालले आहे.

 

आयटीआय मधील विविधता (व्यवसाय) –

आयटीआय हे क्षेत्र बघायला गेल्यास अतिशय व्यापक आणि विविध संधी उपलब्ध करून देणारे दिसू शकते. कारण यामध्ये शिकायला मिळणारे वेगवेगळ्या प्रकारांच्या व्यवसायांची ओळख करून देतात. ज्यामध्ये विद्यार्थी त्यांना आवडेल त्या व्यवसायात आपले करियर घडवू शकतात. AISSMS – Private Industrial Training Institute संस्थेमध्ये यापैकी १२ व्यवसाय प्रकारातील एकूण ५० तुकड्या आहेत. ज्यात विद्यार्थ्याने निवडलेल्या क्षेत्रात त्याला योग्य ते मार्गदर्शन दिले जाते.

आयटीआय नंतर करियरचे मार्ग –

आजकाल शैक्षणिक करीयर निवडण्यासाठी विद्यार्थी आणि पालक दोघेही सर्वप्रथम त्या क्षेत्रातील भविष्यातील संधींचा आढावा घेतात. त्या दृष्टीने बघायला गेलं तर आयटीआय मधील संधी आणि अभ्यासक्रम बघता हे विद्यार्थ्यांसाठी उत्तम करियर घडवण्याचे क्षेत्र म्हणले जाऊ शकते. आयटीआय कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय असतात. ज्यामध्ये विद्यार्थी त्यापुढील उच्च शिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

 

अ) उच्च शिक्षण – 

आयटीआय नंतर पदविका करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आयटीआय उत्तीर्ण झालेले असल्यास थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळू शकतो. यामध्ये आयटीआय प्रशिक्षण उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २% जागा राखीव असतात. त्यामुळे आयटीआय प्रशिक्षणाचा पदविकेसाठी विद्यार्थ्यांना विशेष उपयोग होतो. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयटीआय विद्यार्थ्यांसाठी आणखी एक पर्याय म्हणजे AITT परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात. नॅशनल कौन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग (NCVT) यांच्याकडून या परीक्षा घेतल्या जातात. AITT उत्तीर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना NCVT कडून राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (एनटीसी) दिले जाते.

ब) अल्पमुदतीचे कोर्स –

या दरम्यान विद्यार्थ्यांना काही Short term Course करण्याचा पर्याय देखील उत्तम असू शकतो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काही अल्पमुदतीचे कोर्सदेखील उपलब्ध असतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास
होण्यामध्ये विशेष भर पडतो. भविष्यात कंपनीमध्ये नोकरी करत असताना किंवा स्वतः उद्योजक म्हणून वावरत असताना या कोर्सेसचा उपयोग होऊ शकतो.

क) रोजगार संधी –
विद्यार्थ्यास आयटीआय कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोकरी करणे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करणेदेखील शक्य असते. औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने विद्यार्थ्यास उत्तम रोजगार मिळवता येऊ शकतो. औद्योगिक क्षेत्रात शासन उपक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये शैक्षणिक कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना याच कंपन्यांमध्ये On Job Training करता येऊ शकते. इतर देशांत आयटीआय क्षेत्रातील कामगारांची मागणी असल्यामुळे परदेशात देखील आयटीआय मधील विद्यार्थ्यांना विशेष नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

ड) खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीच्या संधी –

आयटीआय मधील विद्यार्थ्यांना आणखी एक उत्तम करियरची संधी म्हणून सार्वजनिक क्षेत्रास बघितले जाऊ शकते. आयटीआय पूर्ण केलेले विद्यार्थी रेल्वे, टेलिकॉम / बीएसएनएल, आयओसीएल, ओएनसीजी, राज्यनिहाय पीडब्ल्यूडी आणि इतर अनेक सार्वजनिक क्षेत्रातील विभागांमध्ये नोकरी मिळवू शकतात. याचबरोबर महत्वाचे म्हणजे भारतीय सैन्यदलात देखील आयटीआय क्षेत्रातील विद्यार्थ्यास करियरच्या संधी असतात. आयटीआय मधील विद्यार्थ्याकडे मेकॅनिक किंवा इलेक्ट्रिकल मधील शिक्षण आणि कौशल्य असल्याने खाजगी क्षेत्रात त्यांना नोकरीसाठी विशेष मागणी दिसून येते. तसेच खाजगी क्षेत्रातील शेती, बांधकाम विभाग, कापड तसेच ऊर्जा अशा अनेक क्षेत्रात नोकरीची संधी  विद्यार्थ्यांस मिळू शकते.

इ) स्वयंरोजगार –

आयटीआय कोर्सेसमधील अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यवसाय करण्याची इच्छा असते. त्यामुळे आपले शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी आणि उत्तम कौशल्य यांच्या जोरावर विद्यार्थी भविष्यात एक उत्तम उद्योजक बनू शकतो.

औद्योगिक क्षेत्रामधील या सर्व संधींचा उत्तम लाभ आयटीआय मधील विद्यार्थ्यांना घेता यावा आणि त्यासाठी त्यांचा योग्य पद्धतीने विकास करणे यासाठी AISSMS-Private Industrial Training Institute संस्था कायम कार्यरत आहे. संस्थेत शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर देखील तितकाच भर दिला जातो जेणेकरून भविष्यात औद्योगिक क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी आपल्या कौशल्य आणि ज्ञानाच्या आधारावर अनेक यश प्राप्त करू शकेल.

-प्राध्यापक, श्री. राजेंद्र वाळुंज

 प्राचार्य

AISSMS – Private Industrial Training Institute