इंजिनियरिंग ड्रॉइंग म्हणजे इंजिनियर्सची भाषा!

तांत्रिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनियरिंग ड्रॉइंग. थोडक्यात, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही इंजिनियर्सची भाषा असते. भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार, संकल्पना, भावना हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे साधन होय. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात; परंतु तांत्रिक शिक्षणात या भाषा उपयुक्त ठरत नाहीत. त्याऐवजी चित्रकला ही संकल्पना उपयोगात आणून एका व्यक्तीकडून विविध विचार अनेक व्यक्तींपर्यंत पोहचवणे सहजरित्या शक्य होते. म्हणूनच, अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींसाठी आपल्या संकल्पनांचे किंवा विचारांचे व्यवस्थितपणे दृश्य स्वरूपात संक्रमण करण्यासाठी जी पद्धत शोधून काढली; त्या पद्धतीलाच ‘इंजिनियरिंग ड्रॉइंग’ असे म्हणतात.

मोटारगाडी, रेल्वे, विमान, घडयाळ इ. प्रकारची अनेक यंत्रे तसेच या यंत्रांचे वेगवेगळे भाग निरनिराळ्या ठिकाणी तयार होतात. हे तयार करणाऱ्या कामगाराला/कारागिराला यंत्राची किंवा यंत्राच्या विशिष्ट भागांची माहिती तोंडी सांगणे शक्य आणि सोईचेही नसते. त्यामुळे अभियंता त्या यंत्राचे किंवा विशिष्ट भागांचे प्रमाणबद्ध चित्र काढून कामगाराला/कारागिराला देत असतो. प्रमाणबद्ध चित्रावरून कामगाराला/कारागिराला यंत्राची तसेच यंत्राच्या भागांची व्यवस्थित कल्पना येते आणि त्यातून निर्मिती सहज शक्य होते. याच कारणामुळे, अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या काम करण्यासाठी प्रत्येकाला इंजिनियरिंग ड्रॉइंग या विषयी सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे.

साधारणत: इंजिनियरिंग ड्रॉइंगमध्ये कुठल्याही यंत्राचे तसेच यंत्रांच्या वेगवेगळ्या भागांचे चित्र रेखाटून त्यात लांबी, रुंदी, उंची इत्यादिपासून ते वापरण्याची जागा, वापरला जाणारा धातू, रंग, वजन या सर्व बाबींची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळेच यंत्रनिर्मिती प्रक्रिया व काही काळानंतर त्या यंत्राची दुरुस्ती करणे सहज शक्य होते. उदा. मोटार वाहनाची निर्मिती ते गॅरेजमध्ये होणारी दुरुस्ती त्याचबरोबर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, हाऊस वायरिंग, पाणी पुरवठा/गॅस पुरवठा या सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया व दुरुस्ती सहज होते.

औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने निर्मितीचा वेग वाढविण्यात इंजिनियरिंग ड्रॉइंगचा मोठा वाटा आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंगच्या माध्यमातून प्रत्येक यंत्राच्या तसेच यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती प्रक्रिया, दुरुस्ती यामध्ये लागणारा वेळ कमी होऊन उत्पादन वाढीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.

वरील मांडलेल्या सर्व गोष्टींचा बारकाई अभ्यास व विचार केल्यास लक्षात येते, की इंजिनियरिंग ड्रॉइंग एक महत्त्वाचा विषय असून त्याची इत्यंभूत माहिती व ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंग हा इंजिनियर्सचा आत्मा आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

 

– श्री. अनिलकुमार अर्जुन देसले

(इंजिनियरिंग ड्रॉइंग निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)