औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय विद्यार्थ्यांना व्यावहारिक व तांत्रिक शिक्षण पुरवते. यामध्ये शिकवले जाणारे विषय सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित नसतात, तर प्रत्यक्ष उद्योग/व्यवसाय क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्यांचेही परिपूर्ण शिक्षण देतात. औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रमातील एक खूप महत्त्वाचा व मूलभूत विषय म्हणजे कार्यशालेय गणित व विज्ञान. हा विषय शैक्षणिक उद्देशांच्या पलीकडे जाऊन उद्योग/व्यवसायातील कार्यक्षम, अचूक व कुशल कामकाजासाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करतो. कार्यशालेय गणित व विज्ञान हा विषय आयटीआयमध्ये इतका महत्त्वाचा का मानला जातो, त्याचे इतके महत्त्व का आहे याबाबतची माहिती खाली दिली आहे.
१. मोजणी व प्रमाण गणना: कार्यशालेय गणित व विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या मोजमापाच्या उद्देशांसाठी महत्त्वपूर्ण आहे. गणिती संकल्पनांचा पाया मजबूत करण्यासाठी हा विषय उपयुक्त ठरतो. यांत्रिकी, वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन, फिटर अशा विविध ट्रेड्समध्ये अचूक मोजमापासाठी या विषयाची मोठी मदत होते.
२. सटीकता व अचूकता: तांत्रिक कामांमध्ये लहानसहान चुकादेखील मोठे अपयश निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या घटकाची काही मिलीमीटरने चुकलेली मापे संपूर्ण यंत्रप्रणाली फसवू शकतात. कार्यशालेय गणित व विज्ञानाच्या मदतीने या चुका टाळता येतात. परिणामी, आपल्याला अचूक कामगिरी सुनिश्चित करता
येते व गुणवत्तेची हमी देतो.
३. समस्यांचे निराकरण: कार्यशालेय गणित व विज्ञान या विषयाद्वारे गणिती सूत्रे, तर्कशुद्ध विचार तसेच वैज्ञानिक सिद्धांत यांचा वापर करून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी समस्या सोडवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त होते. समस्यांचे निराकरण करताना विद्यार्थ्यांना क्षेत्रफळ, घनफळ, कोन, प्रमाण, प्रमाणपत्र, प्रमाणानुसार बदल, त्रिकोणमिती, अंकगणितीय गणना व बीजगणित यांसारख्या गणिती संकल्पनांचा उपयोग करता येतो. तसेच, तापमान, दाब, द्रवांचे प्रवाह, विद्युतप्रवाह, गुरुत्वाकर्षण यासारख्या संकल्पनांचा वापर करून तांत्रिक समस्यांचे मूल्यमापन करू शकतात.
४. शैक्षणिक व व्यावसायिक विकास: कार्यशालेय गणित आणि विज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा विश्लेषणात्मक विचारशक्तीला चालना मिळते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या चालू शैक्षणिक व भविष्यातील व्यावसायिक जीवनात प्रचंड फायदा होतो.
५. यांत्रिक व इलेक्ट्रिकल काम: औद्योगिक प्रशिक्षण घेत असताना यांत्रिकी, इलेक्ट्रिकल अशा विविध वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना विविध घटकांची, गोष्टींची गणना करावी लागते. यासाठी कार्यशालेय गणित व विज्ञान अत्यावश्यक ठरते.
६. संसाधनांचा कार्यक्षम वापर: कार्यशालेय गणित व विज्ञान या विषयाच्या मदतीने विद्यार्थी साधनसामग्री, ऊर्जा, इंधन यांसारख्या संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर करू शकतात. जेणेकरून अपव्यय टाळता येतो व उत्पादनाची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता वाढते.
औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रमातील ‘कार्यशालेय गणित व विज्ञान’ हा विषय पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तांत्रिक विकासाचा पाया ठरला आहे. याच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये अचूकता, सृजनशीलता, विश्लेषण कौशल्य व व्यावसायिक सजगता निर्माण होते. त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा असून उद्योग/व्यवसाय जगतात यशस्वी कारकिर्द घडवण्यासाठी बळकट पायरी आहे.
– रामचंद्र शिवाजी जगताप
(कार्यशालेय गणित व विज्ञान निदेशक, एआयएसएसएमएस आयटीआय)