आयटीआय कोर्स म्हणजे काय?

आयटीआय हा एक औद्योगिक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. Industrial Training Institute म्हणजे आपल्या मराठी भाषेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था होय. आयटीआय ही शासनमान्य संस्था असून ज्यात विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध टेक्निकल (तांत्रिक) व नॉन-टेक्निकल (गैर-तांत्रिक) विषयांवर शिक्षण दिले जाते. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञानावर जास्त भर दिला जातो. आयटीआय कोर्स शिकवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सरकारी व खाजगी प्रशिक्षण संस्था/महाविद्यालये असून दरवर्षी यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीमुळे आयटीआय कोर्स लोकप्रिय असून दरवर्षी लाखों विद्यार्थी यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वायरमन, टर्नर इ. अशा अनेक ट्रेड्सचा समावेश यात आहे. ट्रेडनुसार विद्यार्थ्याला संबधित गोष्टींचे संपूर्ण ज्ञान दिले जाते. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना पसंतीचा ट्रेड व महाविद्यालय निवडण्याचा पर्याय असतो. आयटीआयच्या प्रवेशाची प्रक्रिया dvet.gov.in या महाराष्ट्राच्या सरकारी वेबसाईटच्या (संकेतस्थळ) माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. दहावी-बारावी नुकतेच पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढे काय करावे, हा प्रश्न भेडसावत असतो. अनेक मार्ग त्यांच्यासमोर उभे राहिल्याने ते गोंधळून जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की आपण एखाद्या चांगल्या कोर्सला प्रवेश घ्यावा तसेच त्यातून चांगली नोकरी मिळवावी किंवा उद्योग- व्यवसाय सुरू करावा. विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोर्सला प्रवेश घेण्याअगोदर त्या संबंधित कोर्सबद्दल पूर्ण माहिती घेणे खूप आवश्यक आहे. कारण, कोर्स निवडताना झालेली चूक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोर्ससंबंधी स्वत: संपूर्ण माहिती घेऊन किंवा वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन कोर्स निवडावा. आयटीआय ट्रेडचे प्रकार कोणते आहेत?
इंजिनीअरिंगमध्ये ज्याप्रमाणे विविध शाखा असतात, त्याचप्रमाणे आयटीआयमध्येही विविध ट्रेड्स आहेत. प्रत्येकाला आवडीनुसार ट्रेड निवडण्याची मुभा आहे. आयटीआयमधील ट्रेड्स दोन प्रकारांत विभागले आहेत.
१) इंजिनीअरिंग ट्रेड्स यामध्ये सर्व तांत्रिक ट्रेड्सचा समावेश असतो. विशेषत: गणित, विज्ञान तसेच तंत्रज्ञान या विषयांशी संबंधित ट्रेड्स यामध्ये येतात. तंत्रज्ञान, संगणक यांसारख्या विषयांमध्ये आवड असणारे विद्यार्थी हे ट्रेड्स निवडतात.
२) नॉन-इंजिनीअरिंग ट्रेड्स यामध्ये सर्व गैर तांत्रिक ट्रेड्सचा समावेश असून तांत्रिक विषय यात नसतात. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक व वैज्ञानिक विषयात आवड नाही, त्या विद्यार्थ्यांद्वारे या ट्रेड्सची निवड केली जाते. आयटीआय कोर्स किती वर्षाचा असतो?

कोर्सचा कालावधी सर्व ट्रेडसाठी सारखा नसून ६ महिने ते २ वर्षे असू शकतो. इंजिनीअरिंग (अभियांत्रिकी) शिक्षणात सर्व शाखांसाठी ४ वर्षांचा कालावधी असतो; परंतु आयटीआयमध्ये कोर्सनुसार कालावधी बदलत जातो. फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन या ट्रेडचा कालावधी २ वर्षांचा असतो. तर
सेविंग, प्लंबर, वेल्डर हे ट्रेड १ वर्षांचे असतात. आयटीआय कोर्सची प्रवेश पात्रता काय आहे? आयटीआय कोर्सची प्रवेश पात्रता खालीलप्रमाणे:
१) किमान १४ वर्षे ते कमाल ४० वर्षे वयोमर्यादा
२) दहावी/बारावी उत्तीर्ण (गुणांची अट नाही)

आयटीआय कोर्स झाल्यानंतर काय करावे?
विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न नेहमी असतो, की आयटीआय नंतर पुढे काय करावे? तर, आयटीआयचे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंजिनीअरिंग’ किंवा‘डिप्लोमा’ अभ्यासक्रम उपलब्ध असून या माध्यमातून ते पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात. बहुतांशी, विद्यार्थी आयटीआय झाल्यानंतर नोकरीला प्राधान्य देतात. सरकारी व खाजगी या दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. आयटीआय पूर्ण
झाल्यावर नोकरीसाठी टेक्निकल सेक्टर (तांत्रिक विभाग) व नॉन-टेक्निकल सेक्टर (गैर-तांत्रिक विभाग) मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. MIDC मध्ये आयटीआय विद्यार्थ्यांसाठी नोकरीचे प्रमाण जास्त आहे. आयटीआय झाल्यानंतर नोकरी व्यतिरिक्त स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करता येतो. इलेक्ट्रिशियन तसेच वेल्डर आपल्या स्वत:चे व्यावसायिक दुकान टाकू शकतात.

– श्री. राजेंद्र वाळुंज,
(उप-प्राचार्य, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
अधिक माहितीसाठी:
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे आयटीआय बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे.
संपर्क क्र.: ९२८४१८२९२७/९७६४५६५६७९/९०४९०५७५६७