The Ideology of AISSMS ITI

प्राध्यापक, श्री. राजेंद्र वाळुंज

 प्राचार्य

“आज औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या मनुष्यबळाची गरज बघता या क्षेत्रात संस्थेच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ पुरवणे आणि त्यास अनुसरून उच्च गुणवत्तेचे तांत्रिक शिक्षण बेरोजगारांना देऊन त्यांच्यात रोजगाराच्या संधी वाढवणे हि संस्थेची मूळ विचारधारा आहे.”

औद्योगिक क्षेत्रातील तरुणांना उत्तम प्रशिक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण प्राप्त करून देणे व त्यांच्यात योग्य गुणांचा विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी ‘ AISSMS संस्थेअंतर्गत असणारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ’ कार्यरत आहे. संस्थेत विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रातील कोर्सेस उपलब्ध असून त्यामध्ये अभ्यासक्रमासोबत संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देखील दिले जाते. म्हणजेच एकंदरीत औद्योगिक क्षेत्रात लागणारे मनुष्यबळ आणि तरुणांमध्ये रोजगाराची असणारी
गरज या दोन गोष्टींमध्ये योग्यरीत्या दुवा साधण्याचे काम संस्था करत आहे.

उद्देशाभिमुख स्थापना –

१९३२ मध्ये AISSMS संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीला मिलिटरी स्कूल चालू करण्यात आले आणि त्यानंतर १९९१ मध्ये संस्थेने आपले तांत्रिक क्षेत्रातील काम सुरु केल्यानंतर AISSMS-Private Industrial Training Institute ची स्थापना करण्यात आली व त्या पाठोपाठच AISSMS संस्थेच्या इतर शाखा देखील स्थापित करण्यात आल्या.

१९९१ मध्ये सोलापूर महामार्गावर असलेल्या बोरीभडक ता.दौंड जि.पुणे येथे संस्था सुरू करण्यात आली. पुण्यापासून साधारण ३० किमी अंतरावर संस्था आहे. संस्थेचे वैशिष्ठय म्हणजे ग्रामीण भागात संस्था स्थापन करण्यात आली असून ग्रामीण भागातील तरुणांना देखील उत्तम शिक्षण आणि रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कार्यरत आहे.

 

संस्थेचा परिसर आणि पायाभूत सुविधा –

विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवणे यासाठी नेहमीच आमचा प्रयत्न असतो. आज औद्योगिक क्षेत्रात विकसित होत असणाऱ्या नवनवीन तंत्र आणि आणि पद्धती यांची माहिती विद्यार्थ्यांना असावी यासाठी अद्यावत यंत्रसामग्री आणि सुविधा दिल्या जातात जेणेकरून काळानुरूप विकसित होत असणारे तंत्रज्ञान येथील विद्यार्थ्यांना ज्ञात असावे. विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी बस सेवा देखील पुरवली जाते. संस्थेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडी असून या निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.

विकासात्मक तत्व आणि उद्दिष्ट्ये –

ग्रामीण भागातील तरुणांना करियरच्या वाटा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना भविष्यात रोजगाराच्या संधी आणि स्वतः एक उद्योजक बनण्याची क्षमता प्राप्त करून देणे हे संस्थेच्या मूळ उद्दिष्ठ्यांपैकी एक आहे. त्यासाठी प्रशिक्षण आणि इतर शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्था आपले कार्य करत आहे. या दरम्यान प्रशिक्षण देत असताना विद्यार्थीवर्गाचा परीक्षेत सकारात्मक निकाल लावणे आणि महत्वाचे म्हणजे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्दयार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट्च्या माध्यमातून नोकरीची संधी अथवा विद्यार्थ्यास स्वतः उद्योजक व्हायचे असल्यास त्यासाठी मार्गदर्शन दिले जाते. त्या दरम्यान विद्यार्थ्यांकडून काही नियम आणि शिस्तीचे पालन होणेदेखील अपेक्षित असते ज्यामध्ये वेळेच्याबाबतीत नियमांचे पालन करणे तसेच बहुतेक वेळा मशीनवर काम असल्याने स्वतःची आणि मशीनची सुरक्षितता पाळणे गरजेचे आहे.

नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती!

आज औद्योगिक क्षेत्रातील कुशल कामगारांच्या बाबतीत असणाऱ्या गरजा लक्षात घेता राज्य सरकारनेदेखील त्याच पद्धतीने आयटीआय मधील अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. ज्यामध्ये आयटी क्षेत्रातील इंडस्ट्रीसोबत टाय-अप करून नवनवीन योजना राबविण्याचा प्रयत्न असतो. याच अनुषंगाने आपल्या संस्थेने देखिल Ace Kudale, Ford अश्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्याचा विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

संस्थेत १२ व्यवसाय प्रकारांमधील एकूण ५० युनिट्स असून ६००+ विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. ज्यामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काही Short term Courses देखिल सुरु केलेले आहेत. आज विद्यार्थी शिक्षण घेत असतांना त्यांना प्रात्यक्षिक शिक्षण देखील ज्ञात असावे म्हणजेच अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी एक बहुकुशल कारागीर व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न असतो, ज्यामध्ये नोकरी प्रशिक्षण आणि औद्योगिक भेटींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित केले जातात. जेणेकरून भविष्यात रोजगार किंवा स्वतः उद्योजक म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व कौशल्य त्या विद्यार्थ्यास या शैक्षणिक प्रवासादरम्यान अवगत होऊ शकतील.

मानांकने –

  • २००३ – २००४ आणि २००४ – २००५ मध्ये शासनाने केलेल्या निरीक्षणात संस्थेने सातत्याने ‘ अ’ दर्जा प्राप्त केलेला आहे.
  • २००५ मध्ये संस्थेला गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर स्थान देण्यात आले होते
  • संस्थेने ISO 9001:2015 प्रमाणपत्र मिळवले आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे प्रमाणपत्र मिळविणारी महाराष्ट्रातील हि पहिली संस्था आहे.

संस्थेची यापुढील वाटचालदेखिल भविष्यातील औद्योगिक क्षेत्रातील विकास आणि गरजा बघता त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची असेल. एकंदरीत शिक्षण घेत असताना इंडस्ट्री आणि समाज या दोघांकडून असणाऱ्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्याची क्षमता असण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची जडणघडण संस्थेत कायम होत राहील.

-प्राध्यापक, श्री. राजेंद्र वाळुंज

 प्राचार्य

AISSMS – Private Industrial Training Institute