आजच्या यंत्र युगाचे मूळ औद्योगिक क्रांतीमध्ये व यंत्र निर्मितीमध्ये दडलेले आहे. ‘कौशलं बलम्’ अर्थात ‘कौशल्य हेच बळ’ हेच ब्रीद वाक्य अंगीकारून आपल्या औद्योगिक प्रशिक्षणाची उभारणी झाली आहे. आपल्या भारत देशाला युगानुयुगे हस्तकौशल्याची आगळीवेगळी परंपरा लाभली असून पुरातन मंदिरे, लेण्या, शिल्पे, भित्तिचित्रे हे आजही इतिहास साक्षी आहेत. हस्तकौशल्य/हस्तकला आपल्या भारतीयांच्या नसानसांत भिनलेली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जुन्या काळात यंत्रनिर्मिती वगैरे प्रकार आपल्यासाठी नवीन होता पण आज इतर विकसित देशांच्या तुलनेत भारताने औद्योगिक क्षेत्रात केलेली प्रगती ही लक्षणीय आहे.
साधारण युरोपीय देशांमध्ये १७६० ते १८५० या कालखंडात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. भारतात मात्र औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ ही १८५४ च्या सुमारास मुंबईमधील एका सूतगिरणीपासून झाली. पुढे जाऊन भारतात पहिला लोह व पोलाद कारखाना जमशेदजी टाटा यांनी १९०७ मध्ये सुरू केला, हे आपण जाणतोच. दिवसेंदिवस, औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत गेले आणि हळूहळू भारतातही औद्योगिकीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हे सर्व घडत असताना कारखान्यांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासू लागली. त्याच कालावधीत भारताला इंग्रजांच्या गुलामगिरितून नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. तत्कालीन सरकारला समाज साक्षरतेवर तसेच औद्योगिक क्षेत्रात प्रगती साधायची होती. म्हणूनच, Directorate General of Training (DGT) अंतर्गत १९५० साली ‘शिल्प कारागीर योजना’ अंमलात आणली. या योजनेचा मुख्य उद्देश कारखान्यांना प्रशिक्षित व कुशल कामगार देऊन सद्यस्थितील बेरोजगारीवर मात करणे, हा होता. शिल्प कारागीर योजनेंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आज घडीला ६ महिने ते २ वर्षे इतका कालावधी असणारे १४९ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे/कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
आज शिक्षणाचे कितीही पर्याय उपलब्ध झाले किंवा जग कितीही आधुनिक झाले तरीही या आधुनिकतेच्या निर्मितीसाठी लागणारा कामगार वर्ग हा या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधूनच तयार होणार आहे. आत्ताच्या नवीन NSQF (National Skill Qualification Framework) शिक्षण पद्धती व शासनाच्या नवीन शिक्षणिक धोरणामुळे बहू कौशल्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या संधीदेखील निर्माण झाल्या आहेत व उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योगही आहेत. चांगला योग साध्य करण्यासाठी कर्मातील कौशल्याची गरज असते कारण “योग हेच कर्मातील कौशल्य आहे”, असे योगेश्वर श्रीकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील पन्नासाव्या श्लोकात म्हणतात. जिथे स्वत: योगेश्वर श्रीकृष्ण जर आपल्याला कर्मसु कौशल्यम् असे सांगत असतील तर क्षेत्र कोणतेही असो ‘कौशलं बलम्’ या गोष्टीला पर्याय नाही.
‘बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥इति॥’
या श्लोकात आपल्या ब्रीद वाक्याचा म्हणजेच ‘कौशलं बलम’ हा श्लोकांश समाविष्ट आहे. अशा पद्धतीने कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून होत आले असून आम्ही त्याचा एक भाग असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
– श्री. संजय गोपाळ तटकरे
(गट निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)